जीवनात परमोच्च यश व आनंद मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे आपली सिग्नीचर स्ट्रेंथ ओळखणे व ती विकसित करणे. सिग्नीचर स्ट्रेंथ म्हणजे प्रत्येकाला देवाने दिलेली अशी देणगी की एखादे काम करण्यामध्ये आपणास सतत आनंद होतो, कधीही थकवा येत नाही आणि समाजात ही आपली तशीच ओळख होते. उदा. शिकवण्यातील व शिकण्यातील आनंद, शूरता, नेतृत्व, संशोधन, दयाळूपणा, विनोद, कल्पकता, कलात्मकता, धाडसी, सामाजिकता, मानवता, चिकित्सा इत्यादी.
महात्मा गांधीनी त्यांच्यातील मानवता व नेतृत्व ही सिग्नीचर स्ट्रेंथ ओळखली व साधारण वकील ते महात्मा गांधी हा प्रवास केला. स्टीव्ह जॉब्जने आपली कलात्मकता व संशोधन ही सिग्नीचर स्ट्रेंथ ओळखली आणि ॲपलचा संस्थापक झाला. मदर तेरेसांनी त्यांची मानवता व दयाळूपणाची स्ट्रेंथ ओळखली व त्या नोबेल पारितोषिक विजेत्या झाल्या. धिरूभाई अंबानीनी त्यांची धाडसी उद्योजकतेची स्ट्रेंथ सिध्द केली व रिलायन्स इंडस्ट्री उभी केली. सयाजी शिंदे यांनी त्यांची कलात्मकता ओळखली व एक वॉचमन ते प्रसिध्द अभिनेते झाले. याही पुढे जाऊन अनेक उद्योजक, कलाकारांनी आपापली सिग्नीचर ओळख निर्माण केली. उदा. शक्तीकपूर म्हटले की “आऊ ललिता!”… राजकुमार म्हटले की “जानी!’’… अमजद खान म्हटले की “कितने आदमी थे?”… नरेंद्र मोदी म्हटले की “ मेरे भाइयों और बेहनो!”… सावरकर म्हटले की कट्टर हिंदुत्व… अण्णा हजारे म्हटले की “जय हिंद!”… धर्मेंद्र म्हंटले की “कुत्ते मै तेरा खून पी जाऊंगा!”… छगनबापा म्हटले की “लिज्जत पापड”… इन्फोसिस म्हटले की नारायणमूर्ती… मिसाईलमॅन म्हटले की एपीजे अब्दुल कलाम… लोखंड किंग म्हटले की लक्ष्मी मित्तल…
असे अनेक उद्योगपती ज्यांनी त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रथम सिग्नीचर स्ट्रेंथ ओळखली व त्यावर आयुष्यभर प्रचंड मेहनत केली म्हणून आयुष्यात परमोच्च यश गाठू शकले. सिग्नीचर स्ट्रेंथ ओळखणे म्हणजे पोलादाला धार लावली तरच चांगली तलवार बनेल, हिर्याला पैलू पाडले तरच चमकणारा हिरा बनेल. चांगल्या दुधातूनच तूप निघेल. शिंपल्यातून मोती मिळतील तसे योग्य त्या ओळखलेल्या सिग्नीचर स्ट्रेंथवर माणसाने काम केले तरच यश मिळेल. ती ओळखण्यासाठी आता अनेक शास्त्रीय प्रकार उपलब्ध झाले आहेत आणि ती विकसित कशी करायची याची तंत्रे व पध्दतही उपलब्ध आहेत. तर डोके खाजवा आणि ओळखा, काय आहे तुमची सिग्नीचर स्ट्रेंथ? करा त्यावर काम व व्हा त्याच क्षेत्रात मोठे यशस्वी उद्योजक व्यक्ती.
प्रकाश भोसले,
लेखक व उद्योग सल्लागार

