राजकारण हा मराठी समाजातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर मराठी समाजाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परंतु सध्याच्या राजकारणाचा अभ्यास केला, तर हे क्षेत्र दिवसेंदिवस घराणेशाहीकडे झुकताना दिसते. महत्त्वाची पदे, निवडणुकीची तिकिटे आणि सत्तेची संधी ही अनेकदा काही मोजक्या कुटुंबांपुरतीच मर्यादित राहतात. सामान्य शेतकरी, कामगार किंवा मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील तरुणांना या व्यवस्थेत प्रत्यक्ष संधी मिळणे अत्यंत दुर्मीळ आहे.
दुष्काळ, बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक तरुण राजकीय आश्वासनांना बळी पडतात. त्यांना शाखाध्यक्ष, युवा नेता, संघटक अशा पदांची नावे देऊन वर्षानुवर्षे कार्यरत ठेवले जाते; परंतु त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल मात्र होत नाही. त्यांच्या उमेदीची वर्षे घोषणाबाजी, बॅनरबाजी, मोर्चे, सभा आणि निरर्थक वाद-विवाद यांत खर्ची पडतात.
दुसरीकडे, या राजकीय नेत्यांची मुले उत्कृष्ट शिक्षण घेतात, परदेशात शिकतात आणि सुरक्षित भविष्य घडवतात. संघर्ष, गुन्हेगारीचे आरोप आणि अनिश्चितता मात्र सामान्य कार्यकर्त्यांच्या वाट्याला येते. समाजातील तरुणांची ऊर्जा विधायक कामांऐवजी राजकीय वापरासाठी खर्च होते, ही चिंतेची बाब आहे.
म्हणूनच मराठी तरुणांनी कोणाच्याही आंधळ्या भक्तीत अडकण्याऐवजी शिक्षण, कौशल्यविकास, उद्योग, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक नेतृत्व याकडे वळण्याची गरज आहे. राजकारणात सहभाग असावा, पण तो जागरूक नागरिक म्हणून; स्वतःचे भविष्य पणाला लावणारा नव्हे.
मराठी माणूस हा कष्टाळू, बुद्धिमान, जिद्दी आणि स्वाभिमानी आहे. इतिहास साक्षी आहे की, जेव्हा मराठी समाजाने शिक्षण, उद्योग आणि एकजुटीचा मार्ग स्वीकारला, तेव्हा त्याने उल्लेखनीय यश संपादन केले. आज प्रत्येक मराठी तरुणाने आपल्या कर्तृत्वाचा झेंडा हाती घ्यावा, स्वतः सक्षम व्हावे आणि इतरांनाही पुढे नेण्याचा संकल्प करावा. एकमेकांना साथ देत, उद्योजकता आणि ज्ञानाचा मार्ग स्वीकारत आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम, सामाजिकदृष्ट्या प्रभावी आणि बौद्धिकदृष्ट्या समृद्ध असा नवा महाराष्ट्र घडवू शकतो. मराठी माणूस पुढे गेला, तर महाराष्ट्राचा भविष्यकाळ नक्कीच अधिक उज्ज्वल होईल.
प्रकाश भोसले,
लेखक व उद्योग सल्लागार




