न्यूनगंड सोडा व स्वत:तील सुप्त शक्ती ओळखा

संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो मराठी लोक मला संपर्क साधतात. सर्वांमध्ये चांगलं टॅलेंट आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, ज्ञानही आहे; पण उद्योग, व्यापार करायचा म्हटलं की एक प्रकारचा न्यूनगंड मनात आहे. व्यापार म्हणजे मराठी माणसाचे कामच नव्हे, असा एक मराठी माणसांच्या मनात स्वत:बद्दल गैरसमज निर्माण होऊन तो मनात इतका घर करून बसलाय की तो काय सहजासहजी निघायला तयार नाही. त्याची कारणं तशीच आहेत, एक म्हणजे आजूबाजूला व्यापाराचे वातावरण नाही, बहुतेक सर्वजण नोकरी करणारेच. लहान मूल हे चिखलाचा गोळा असतं, ते जे पाहिल ते तसेच शिकत जातं मुलं पाहतात, कुटुंबात आजूबाजूला लोक नोकरी करतात. मग आपणही मोठे झाल्यावर नोकरीच करणार. नोकरी मिळविणे हेच एकमेव ध्येय ठरलेले असते. चांगली नोकरी मिळविणे म्हणजे आयुष्यातील यशाचे सर्वोच्च शिखर गाठले असे वाटते. शाळेत चांगला अभ्यास का करावा तर चांगली नोकरी (गुलाम) मिळण्यासाठी… कॉलेजात चांगले गुण मिळवायचे का? तर चांगल्या कंपनीत नोकरी(गुलाम) म्हणून लागणेसाठी… जगात स्वत:हून नोकरदार(गुलाम) बनण्यासाठी इतका आटापिटा व स्पर्धा भारतातच पहायला मिळते.

मी एकदा धार्मिक संस्थानात गेलो होतो, तेथे एक हत्ती होता. त्या हत्तीच्या पायाला एक छोटीशी दोरी बांधली होती, पण एवढी छोटीसी दोरी सोडून तो हत्ती सहज पळून जाऊ शकला असता. माहुताला विचारलं, “एवढ्या छोट्याशा दोरीवर हत्ती कसा काय बांधता? त्याला तर लोखंडी साखळीने बांधायला हवे.” तो माहून म्हणाला, “हे लहान पिल्लू असल्यापासून आम्ही तीच एक दोरी त्याला बांधतोय. तेव्हा हत्तीला पक्का समज झालाय की आपण ही दोरी तोडू शकत नाही.” म्हणजे आता हत्ती कितीही मोठा झाला असला तरी त्याला त्याच्या ताकदीचा अंदाज नाही. त्याची सुप्त शक्ती ही रोजची सवय व आपण काही करू शकत नाही या न्यूनगंडाने भरलेली आहे. सुमारे १० कोटी मराठी लोकांचीही अवस्था ह्या हत्तीसारखी झाली आहे. आपण फक्त नोकरीच करू शकतो, आपण फक्त ग्राहकच बनू शकतो पण आपण उद्योजक बनू शकत नाही, हा न्यूनगंड सवयीने रक्तात इतका भिनलंय की तो निघायला तयार नाही. आपण नोकरी सोडून मालक बनू शकतो, ग्राहक नव्हे तर व्यापारी बनू शकतो. शक्ती, बुध्दी असूनसुध्दा १० कोटी मराठी माणसे गरीबी, बेकारीत नोकरीच्या प्रतीक्षेत, शेतीला पाणी येईल, शेतमालाला भाव मिळेल ह्या प्रतीक्षेत आहेत.

थोडक्याशा आधारावर जगात राहण्यामुळेही मराठी मुलं मागे पडत आहेत. मला एक पदवीधर मुलगा भेटायला आला, पदवी घेऊन २ वर्षे झाली, काही नोकरी नाही. मी विचारलं पदवी करत असताना तू काही तयारी केलीस का? पदवी पूर्ण झालेवर २ वर्षे काय केलेस? त्याचेशी चर्चा केल्यास असं लक्षात आलं की त्याचे पालक त्याला शिक्षण, खर्च, पॉकेटमनी इत्यादीला आरामात पैसे पुरवत होते. त्यामुळे जोपर्यंत पालक पैसे पुरवतायत तोपर्यंत काही काळजी नाही, तसदी घेण्याची व प्रयत्न करण्याची गरज नाही, अशी त्याची बॉडी लॅंग्वेज होती.

तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक म्हातारी होती, तिने एक पोपटाचे पिल्लू आणले. थोडे दिवस घरात पाळले. थोडे मोठे झाल्यावर तिने ते बागेत सोडले पण ते काय हवेत उडेना. ते पिल्लू ती तिच्या बागेतील एका फांदीवर बसविले, तिने झाड हलवले, आवाज काढले, पण काही केल्या पोपट काही हवेत झेप घेईना. शेवटी म्हातारीने गावात दवंडी पिटवली की पोपट हवेत उडवेल त्याला ५ हजार बक्षीस! एका शेतकर्‍याने ते चॅलेंज घेतले. तो बागेत आला आणि ज्या फांदीवर पोपट बसला होता, ती फांदी त्याने एका झटक्यात मोडून काढली. मग काय, पोपट हवेत उडाला व उंच उंच उडू लागला. सर्वांना इतकी साधी सोपी गोष्ट करायची होती, हे कळलेच नाही.

आजच्या बहुसंख्य पालकांनाही कळलेली नाही. मराठी मुलांत खूप मोठी सुप्त शक्ती आहे; पण पालक आधार देतायत ना? दोन वेळच खायला मिळतंय ना? मग कशाला उद्योग, व्यापाराच्या झंझटीमध्ये पडा? कशाला मुंबई, पुण्याला जा? बघूया, थोडे दिवस, काही महीने, काही वर्षे वाट बघू. देऊ स्पर्धा परीक्षा वगैरे. अशात वर्षानुवर्षे जातात व शेवटी स्वत:मध्ये सुप्त शक्ती आणि टॅलेंट असतानासुध्दा करिअर बरबाद होते. तेव्हा जशी त्या शेतकर्‍याने फांदी मोडून काढल्याने पोपट उडू लागला, त्याचप्रमाणे पालकांनी मुलांचा आधार काही ठराविक काळानंतर काढून घ्यावा. तरच मुलं कर्तृत्व, ज्ञान दाखवतील. व्यापारी समाजातील मुलं काही स्वर्गातून व्यापार शिकून येत नाहीत, तीही तुमच्या-आमच्यासारखी माणसच आहेत. मराठी माणसात असलेले वाघाचे धाडस, हत्तीएवढी ताकद व पक्षाप्रमाणे उंच झेप घेण्याचे बळ आहे; पण न्यूनगंड विसरून व स्वत:ची ताकद स्वत: ओळखून उद्योगविश्वात झेप घेतली पाहिजे.

प्रकाश भोसले
लेखक व उद्योग सल्लागार

न्यूनगंड सोडा व स्वत:तील सुप्त शक्ती ओळखा (Leave inferiority complex and recognize the dormant potential within yourself..) - मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti)
न्यूनगंड सोडा व स्वत:तील सुप्त शक्ती ओळखा (Leave inferiority complex and recognize the dormant potential within yourself..) – मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti)

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top