“मराठी मानबिंदू सन्मान” कार्यक्रम पुण्यात उत्साहात संपन्न — मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि मातृगंध फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

पुणे, महाराष्ट्र – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि मातृगंध फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मराठी मानबिंदू सन्मान” हा कार्यक्रम पुण्यातील श्रमिक पत्रकार भवन येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मराठी भाषा, उद्योग, आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई होते, तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष मा. श्री. विनोद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, आणि मातृगंध शिलेदार सुहासी सालके यांच्या शिवगर्जनेनंतर मान्यवरांनी व्यासपीठाची शोभा वाढवली.

मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या पुणे शाखेचे समन्वयक मा. श्री. प्रमोद उमरदंड पाटील यांनी समितीच्या व मातृगंध फाउंडेशनच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष मा. श्री. प्रदीप सामंत यांनी मुंबईहून पुण्यात येऊन कार्यक्रमात अचानक हजेरी लावून उपस्थितांना सुखद आश्चर्याचा क्षण दिला. “ना शाल, ना श्रीफळ, फक्त पुस्तक” या अभिनव संकल्पनेतून मा. राज जाधव आणि मा. प्रदीप सामंत यांनी मान्यवरांचा पुस्तक भेट देऊन सत्कार केला.

सन्मानित मानबिंदू:

  • श्री. रोहित जोशी – उद्योग क्षेत्रासाठी
  • श्री. प्रतीक वाईकर – क्रीडा (खो-खो)
  • श्री. कौशिक लेले – भाषा संवर्धनासाठी

या तिघांना तुकाराम पगडी-उपरणे, पुस्तक, आणि मराठी मानबिंदू सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सन्मानार्थींच्या वतीने श्री. कौशिक लेले यांनी भाषेचे अनेक पैलू उलगडणारे अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात सतत कार्यरत राहणाऱ्या शिलेदार सौ. नीता नाईक, श्री. राहुल मुंगले आणि श्री. उमेश गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला.

यानंतर प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले:

  • मा. श्री. प्रदीप सामंत यांनी सांगितले की, मराठी ही केवळ बोलीभाषा नव्हे, तर ती शिकण्याची, विचार करण्याची भाषा असली पाहिजे. मातृभाषेत शिक्षण घेतले पाहिजे, हाच आपला खरा विकास होईल.
  • मा. श्री. विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की, भाषा हा फक्त अभिमानाचा विषय न राहता कृतीचा विषय आहे. मराठीचा प्रचार व प्रसार ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
  • मा. डॉ. सतीश देसाई यांनी सुचवले की, दिवाळीत सामूहिक वाचनाच्या उपक्रमाला पुन्हा चालना मिळावी, आणि मातृभाषेत शिक्षण घेणारी मुले आयुष्यात अधिक यशस्वी होतात, हे आपल्या संस्कृतीचे ठळक उदाहरण आहे.

मातृगंध चळवळीचे उल्लेखनीय कार्य :

  • ८५०+ तास मराठी वाचन उपक्रम
  • राज्यभर वाचन कट्टे सुरु करणे
  • हाताक्षर कार्यशाळांचे आयोजन

या उपक्रमांची माहिती मातृगंध संस्थेच्या संस्थापिका सौ. निलाक्षी साळके-पाटील यांनी दिली. मा. श्री. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक, तर मा. श्री. शिवमूर्ती भडंगे यांनी आभारप्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही निलाक्षी साळके-पाटील यांनी केले.

कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात मा. श्री. माधव राजगुरू, सुभाष इनामदार, श्रीनिवास वारुंजीकर, गांधी, किरण काळे, अय्यर आणि अनेक स्नेही, कुटुंबीय, बालशिलेदार यांनी सहभाग घेतला.


जय महाराष्ट्र! जय मराठी! मराठीचा अभिमान, सर्वांचा मान! 🚩

1 thought on ““मराठी मानबिंदू सन्मान” कार्यक्रम पुण्यात उत्साहात संपन्न — मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि मातृगंध फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम”

  1. प्रमोद पाटील

    मराठी भाषा,संस्कृती जतन व संवर्धन करण्याचे महत्वपुर्ण काम समिती चोखपणे बजावत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top