एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथे झोपड्या बांधून अनेक कामगारांची कुटुंब राहायला होती. त्यांची लहान मुलं तेथेच रेल्वे-रेल्वे खेळत असत. कोणी इंजिन बने, कोणी डब्बे… एक मुलगा फक्त चड्डी घातलेला, तो मात्र रोज गार्डच बनायचा व हातात एक फडकं घेऊन त्यांच्यात खेळायचा. मी त्याला विचारले, “तू रोज गार्डच का बनतोस? इंजिन किंवा डबा का बनत नाहीस?” त्या मुलाने उत्तर दिलं, “माझ्याकडे शर्ट नाही, मी डबा व इंजिन झालो तर इतर मुलं माझ्या शर्टाला कसे धरणार? म्हणून मी एक फडकं घेऊन रोज गार्ड बनतो.
मित्रहो, उत्तर आहे अशा तरुणांसाठी जे म्हणतात माझ्याकडे भांडवल नाही, अनुभव नाही, आयडिया नाही, ओळखी नाहीत, जागा नाही. त्या मुलाकडे शर्ट नव्हता म्हणून तो रडत नाही बसला, तो आनंदाने गार्ड बनला व सर्व मुलांत खेळत राहिला. ज्याला आयुष्यात उद्योजक व्हायचे आहे तो ‘ना’ चा पाढा म्हणत बसत नाही. भगवंताने सर्वांना समान शरीर, ज्ञान, वेळ व संधी दिली आहे. जो आहे त्यात धाडसाने कामाला लागतो तोच एक दिवस यशोशिखरावर पोहचतो. चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो, पेट्रोल पंपावर काम करणारा धिरूभाई अंबानी होऊ शकतो, सातशे रुपये पगार घेणारा जॅक हा अलीबाबाचा मालक होऊ शकतो. ज्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे तो कारणं सांगत बसत नाही. आहे त्यात तो कामाला सुरुवात करतो. ज्यांना काही करायचंच नाही ते म्हणतात, “भांडवल असतं तर मीही उद्योजक झालो असतो; आयडिया असती तर मीही मोठा झालो असतो; वशिला असता तर मीही कंपनी काढली असती; अनुभव असता तर मीही काहीतरी सुरू केले असते; मला कोणी मदत करत नाही, नाहीतर मी ही टाटा, अंबानी, बिर्ला झालो असतो.” का रे बाबा? एवढं सगळं दिल्यावर तू काय करणार? एवढं सगळं द्यायला तू काय कुबेराचा मेव्हणा आहेस का? मित्रांनो, आहे त्यात उद्योग सुरू करा, तुमच्यातील स्पार्क दाखवा, अनेकजण येतील मदत करतील. जग चालत्या गाडीत बसतं, बंद गाडया तर रस्त्याकडेला गंजत पडलेल्या असतात.
प्रकाश भोसले
लेखक व उद्योग सल्लागार




