एक कथा: एका गावात किश्या नावाच उनाड पोरगं होतं, टारगटपणा करत फिरायचं, गाव त्याल ‘किश्या’ म्हणायचं. किशाला एकदा एक भला माणूस भेटला. त्या माणसाने त्याला छोट्या २० गुंठे जागेत पानमळा लावायचे शिकविले. किश्याने चांगले उत्पन्न काढले, बरा पैसा आल्यावर तो चांगली कपडे घालू लागला. लोक त्याला आता ‘किसन’ म्हणू लागले. थोड्या महिन्यांनी किसनने शेजाऱ्याची जमीन भाडेपट्ट्यावर घेऊन पानमळा लावला, अजून उत्पन्न वाढले. आता लोक ‘किसनराव’ म्हणू लागले. किसनरावची जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांशी ओळख झाली. तो सर्व शेतकऱ्यांकडून पाने विकत घेऊन शहरात विकू लागला. तो आता व्यापारी झाला, मग लोक त्याला ‘किसनशेठ’ म्हणू लागले. लोकांनी त्याला येता-जाता “नमस्कार किसनशेठ!” म्हटल्यावर तो म्हणायचा, “मी तुमचा नमस्कार घरी जाऊन सांगतो.”
एक परगावचा माणूस गावात आला. त्याला समजेना, किसनशेठ नमस्कार घरी जाऊन सांगतो, असे का म्हणत असतील? त्याने किसनशेठना विचारलं, “तुम्ही नमस्कार घरी जाऊन कोणाला सांगता?” किसनशेठ म्हणाले, “चल माझ्याबरोबर घरी.” घरी जाऊन त्यांनी तिजोरी उघडली आणि बघ म्हणाले. “मी सगळ्यांचा नमस्कार ह्या पैशाला येऊन सांगतो, कारण मला कोणीही नमस्कार करत नाहीत. माझ्याकडे एवढा पैसा आहे म्हणून मला नमस्कार करतात. म्हणजेच या नमस्काराचा खरा हक्कदार ह्या जगात पैसा आहे.”
मित्रहो, तुम्हाला काय बनायच ह्या जगात, किश्या (उनाड, सुशिक्षित बेकार पोर), किसन (एक साधा गरीब माणूस), किसनराव (मध्यमवर्गीय बरा माणूस), किसनशेठ (पैसेवाला व सावकार माणूस) हे तुम्हीच ठरवा. मानसन्मान व नमस्कार तुम्हाला नव्हे; तुमच्यातील ज्ञान, पैसा, संपत्ती व पद-प्रतिष्ठेला मिळत असतो, हे तरुणांनी लक्षात ठेवावे. एका भल्या माणसाच्या योग्य सल्ल्याने आणि चांगल्या संगतीने उनाड किश्याने मेहनतीने पानमळ्याचा व्यवसाय उभा केला आणि टप्प्याटप्प्याने प्रगती करत तो किसनशेठ बनला. ही कथा सांगते की योग्य मार्गदर्शन, परिश्रम आणि आर्थिक प्रगती यामुळेच समाजात मान-सन्मान मिळतो.
प्रकाश भोसले
लेखक व उद्योग सल्लागार




