दादर कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन, मराठी एकीकरण समिती आक्रमक, पोलिसांकडूवून शिलेदारांची धरपकड

दादरमधील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने बुधवारी तीव्र आंदोलन केले. जैन मुनींच्या शस्त्र उचलण्याच्या वक्तव्याविरोधात समितीने आक्रमक होत निषेध नोंदवला. मात्र, आंदोलनस्थळी पोहोचलेल्या समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. आंदोलकांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे.

आंदोलन आणि पोलिस कारवाई

आंदोलनापूर्वी दादर पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. बुधवारी सकाळी ११ वाजल्यानंतर कबुतरखाना परिसरात आंदोलकांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मराठी एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोवर्धन देशमुख म्हणाले, “जैन समाजाने चाकू, सुऱ्या घेऊन आंदोलन केले, तेव्हा पोलीस कुठे होते? आमच्या पाठीशी लोढ्यासारखे मंत्री नाहीत, हे आमचे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री एका विशिष्ट समाजासाठी आहेत. जर कोणी कायदा हातात घेतला, तर आम्ही महामोर्चा काढू. हा विषय धर्माचा नसून आरोग्याचा आहे. काही जण शस्त्रे काढू, मोर्चे काढू अशी भाषा करत असंतोष निर्माण करत आहेत. त्यांना वेळीच आवर घालावा, अन्यथा आम्हालाही प्रत्युत्तरादाखल मोर्चे काढावे लागतील.”

पोलिसांची दडपशाही?

आंदोलनादरम्यान गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी सांगितले, “पोलिसांनी आम्हाला आमची भूमिका मांडू द्यावी. आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी आलो आहोत. पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. ही दडपशाही थांबवावी, आणीबाणीचा काळ आणू नये.” आंदोलकांनी पोलिसांवर दडपशाहीचा आरोप केला आहे.

कबुतरखाना परिसरात तणाव

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कबुतरखाना परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी दुपारी १ वाजेपर्यंत परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील अनेक रहिवासी आणि आजूबाजूच्या सोसायटींमधील लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. कबुतरखाना परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मराठी एकीकरण समितीचा संताप

मराठी एकीकरण समितीने जैन आणि मारवाडी समाजाच्या ६ ऑगस्टच्या आंदोलनावर टीका केली. गोवर्धन देशमुख म्हणाले, “जैन आणि मारवाडी समाजाने पोलिसांवर धक्काबुक्की केली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आणि सामान्य नागरिकांना वेठीस धरले. त्यावेळी तोडफोड आणि न्यायालयाचा अवमान झाला, पण पोलिसांनी काहीच केले नाही. मराठी माणसांनी काहीच करायचे नाही का? ही दडपशाही का सुरू आहे?”

पुढे काय?

मराठी एकीकरण समितीने कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. जर अशा घटना पुन्हा घडल्या, तर समिती महामोर्चा काढण्याचा इशारा देत आहे. सध्या दादर कबुतरखाना परिसरातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसून, पोलिस आणि आंदोलकांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

सदर घटनेची छायाचित्रे

सदर घटनेच्या बातम्या

2 thoughts on “दादर कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन, मराठी एकीकरण समिती आक्रमक, पोलिसांकडूवून शिलेदारांची धरपकड”

  1. खरोखर जे चाललंय अति भयंकर चाललंय, मराठीची दडपशाही चालु आहे आणि माननीय मुख्यमंत्री फक्त बघ्याची भूमिका घेत आहे याला एकच उपाय, मनसे आणि शिवसेना एकत्र 🙏

  2. राजेश कदम

    कायद्याची अंमलबजावणी व्हावी. ईश्वराने प्रत्येक प्राणिमात्राला स्वतंत्र पणे जगण्याची बुद्धी दिलेली आहे. त्यांना परावलंबी करू नका. सर्व कबुतरखाने हटवा. तसेच जे त्यांना दाणे देतात त्यांच्या वर कारवाई व्हावी.

Leave a Reply to राजेश कदम Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top