मराठी वापराबाबत शासनाकडून होत असलेली कुचराई आणि मुख्यमंत्र्यांकडून झालेली भाषेची हेटाळणी

दिनांक १४ जानेवारी २०२४ ते दिनांक २८ जानेवारी २०२४ हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. तरीही यानिमित्ताने शासनाने कुठेही मराठी भाषेचे कार्यक्रम आयोजित केलेले दिसून आलेले नाहीत. महाराष्ट्रातील महानगरांत नोकरी, व्यवसायानिमित्त महाराष्ट्राबाहेरील समाज फार मोठ्या संख्येने स्थिरावला आहे. या समाजाने महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी शिकावी म्हणून शासन काही प्रयत्न करतय असेही दिसून येत नाही.

याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील महानगरे ही झपाट्याने अमराठी होत असून दैनंदिन संपर्काची भाषा ही हिंदी झाली आहे. भरीस भर म्हणून पंतप्रधानांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जनतेला संबोधून भाषण करत असताना मराठी टाळून हिंदीत भाषण करत आहेत. एक मराठी म्हणून ही खचितच खेदाची बाब मला वाटत आहे. महाराष्ट्र राज्यातील कार्यक्रमात सूत्रसंचालन हिंदीत होते आणि स्वतः मुख्यमंत्र्यांकडून राज्यभाषेचा असा अव्हेर दुःखदायक आहे. सर्व महाराष्ट्रातील जनतेला आपण “यापुढं महाराष्ट्रात मराठी गरजेची नाही” असाच संदेश देत आहात. एक नागरिक म्हणून मी आपल्याला मराठीसमोर असलेल्या गंभीर आव्हानांची जाणीव करून देऊ इच्छितो. कृपया वरच्या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण मराठीच्या संवर्धनाकडे लक्ष द्यावं तसेच वैयक्तिक पातळीवर मराठीचा १००% सार्वत्रिक वापर करावा व आपल्या सोबत संपूर्ण मंत्रिमंडळ व प्रशासनाला देखील याची जाणीव करून द्यावी

Scroll to Top