मराठीच्या रक्षणासाठी एकवटली मराठीप्रेमी जनता — शासनाच्या निर्णयांची होळी आणि जाहीर सभेने मुंबईत उमटवला रोषाचा आवाज

मुंबई, २९ जून २०२५
शालेय शिक्षण विभागाच्या मराठीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी, तसेच तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात, मराठी प्रेमी संस्था, शिक्षक संघटना, आणि राजकीय पक्ष एकत्र आलेल्या जाहीर सभेचा मुंबईत आज मोठा गजर झाला. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि मुंबई महानगरपालिकेसमोर झालेल्या या जाहीर सभेत शासनाच्या अन्याय्य आणि मनमानी शैक्षणिक निर्णयांची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.

मराठी अभ्यास केंद्र, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य), शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समिती, आणि राज्यभरातील असंख्य समविचारी संस्थांच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात राज्यातील विविध भागांतून आलेल्या मराठीप्रेमींनी सहभाग घेतला. मराठीच्या अस्तित्वावर होणाऱ्या आघाताविरोधात या सभेने एकजुट दाखवली.

या सभेला ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे, मराठी शाळांची सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, आम्ही शिक्षक सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षण विकास मंच, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, कायद्याने वागा लोकचळवळ, छात्र भारती, सजग फाउंडेशन (सातारा), डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जालना) आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राजकीय पातळीवरही या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, मनसेचे नितीन सरदेसाई, वंचित बहुजन आघाडीच्या दिशा पिंकी शेख, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत, आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.

शासनाच्या निर्णयांचा निषेध करताना वक्त्यांनी ठामपणे सांगितले की, प्राथमिक शिक्षणात तिसऱ्या भाषेची सक्ती ही फक्त शैक्षणिक बाब नाही, तर ती महाराष्ट्राच्या भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अधिष्ठानावर घाला घालणारी प्रक्रिया आहे. “सरकार मराठी विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत आहे,” असा रोष अनेकांनी व्यक्त केला.

सभेच्या समारोपाला निमंत्रक डॉ. दीपक पवार यांनी मराठी जनतेला आवाहन करत म्हटले, “ही फक्त सभा नव्हती, ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीचा रणसंग्राम सुरू होण्याची नांदी होती.”

या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ५ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या हिंदी विरोधी मोर्चाला या सर्व संस्था आणि मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) यांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. मोर्चात राज्यभरातून मराठी शिलेदार सहभागी झाले आहेत.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top