भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भाईंदर येथे पुस्तक वाटप कार्यक्रम

पत्रकार प्रसिद्धीपत्रक

दिनांक: १४ एप्रिल २०२६
स्थळ: भाईंदर (पश्चिम), मीरा-भाईंदर

मराठी एकीकरण समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी समितीच्या शिलेदारांमार्फत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या निमित्ताने भाईंदर पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. “मुंबई महाराष्ट्राचीच” हे पुस्तक सर्व नागरिकांना भेट स्वरूपात देण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान त्या ठिकाणी सुरू असलेल्या शासकीय व प्रशासकीय उपक्रमांच्या अनुषंगाने मीरा-भाईंदर शहराचे आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर डॉ. किशोर पाटील, महानगरपालिका आयुक्त राधा विनोद शर्मा, इतर अधिकारी तसेच नगरसेवक व सभापती यांना देखील सदर पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आत्मसात करून समाजात समता व बंधुतेचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे मांडलेल्या ‘मुंबई ही महाराष्ट्राचीच’ या विचारांच्या अनुषंगाने मराठी अस्मिता जपणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रावर येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जात, धर्म या भेदांना बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने उभे राहणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमास उपाध्यक्ष प्रमोद पार्टे, विजय पाटील, सुरज चव्हाण, गोपीनाथ खुणे, अनिल गंगावणे नितेश सावडेकर, तुकाराम मेहंगडे, संतोष कदम, अभिराज मोरे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top