जुलै ८, २०२५ — हा दिवस मराठी अस्मितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. मीरा-भाईंदरच्या रस्त्यांवर हजारो मराठी बांधवांनी एकत्र येत आपला स्वाभिमान ठामपणे उभा केला. हे फक्त मोर्चा नव्हता, तर मराठी अस्मितेच्या अस्तित्वासाठी लढा होता. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, संघटना, विविध विचारधारांचे नेते आणि सामान्य मराठी जनता एका झेंड्याखाली एकत्र आली, आणि या ऐतिहासिक एल्गाराचे श्रेय जाते मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) या संघटनेला, जिने हा मोर्चा आयोजित करत मराठी माणसांना एकत्र आणले.
घटनेची पार्श्वभूमी:
मीरा रोड परिसरातील काही मुजोर अमराठी व्यावसायिकांनी मराठी भाषेचा अपमान केला आणि याविरोधात अमराठी लोकानी मिरा भाईंदर शहर बंद करत अनधिकृत मोर्चा काढत प्रशासनाला वेठीस धरून मराठी लोकांचा अपमान होईल अशा प्रकारची मते, विडियो प्रसारित केले. याला विरोध करत स्थानिक मराठी संघटनांनी मराठी भाषेच्या मान-सन्मानासाठी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. मराठी एकीकरण समितीने या असंतोषाला दिशा देत, सर्वपक्षीय व सर्वसंघटनात्मक पातळीवर मोर्चा आयोजित केला. मात्र, या मोर्च्याला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली, आणि तणावाला सुरुवात झाली.
मोर्च्याचा दिवस: मराठी अस्मितेचा विस्फोट
८ जुलैच्या सकाळी हजारो मराठी बांधव हातात भगवे झेंडे, बॅनर आणि घोषणाबाजीसह मीरा रोड स्टेशन परिसरात एकत्र झाले. मोर्चा शांततेत मार्गी लागावा यासाठी संयोजन समितीने पोलिसांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक पोलीसांनी काही नेत्यांना ताब्यात घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.
पोलिसांकडून अडथळा आणि धक्कादायक कारवाई:
पोलिसांनी परवानगी नाकारलीच, पण आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करत शिवसैनिक, मनसे कार्यकर्ते, महिला आणि नागरिक यांना अटक केली. अनेक ठिकाणी धक्काबुक्की, लाठीचार्जसदृश्य स्थिती निर्माण झाली. राजकीय व सामाजिक क्षेत्रातून यावर तीव्र संताप व्यक्त झाला.
प्रमुख नेत्यांची वक्तव्ये:
➡️ अविनाश जाधव (मनसे):
“हा एल्गार महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. आम्ही शांततेने मोर्चा काढत होतो. पोलिसांनी अतिरेक करत आम्हाला अटक केली. आम्हाला ११ तासांनीच सोडण्यात आले.”
➡️ अभिजित पानसे (मनसे):
“मीरा रोडमध्ये मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही एक मराठी म्हणून एकत्र आलो आहोत. ही सुरुवात आहे.”
➡️ संदीप देशपांडे (मनसे):
“माझे महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना आवाहन आहे की, मराठी फलक लावल्याशिवाय दुकान चालवू देऊ नका.”
➡️ गोवर्धन देशमुख (मराठी एकीकरण समिती अध्यक्ष):
“ही चळवळ कोणत्याही राजकीय पक्षासाठी नाही, ती मराठीसाठी आहे. सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना एकत्र आणून आम्ही ही चळवळ उभारली.”
➡️ राजन विचारे (खासदार, शिवसेना – उधवा गट):
“प्रताप सरनाईक यांना जर मराठी माणसाची तळमळ असती तर त्यांनी हे मैदान मराठ्यांसाठी खुले केलं असतं. आज त्यांना सामना करावा लागतोय.”
खास बाब – सरनाईक व महेतांचा प्रयत्न अपुरा:
मंत्री प्रताप सरनाईक व आमदार नरेंद्र मेहता यांनी मोर्चा रोखण्यासाठी प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. उलटपक्षी संतप्त जमावाने सरनाईक यांच्यावर बाटली फेकल्याचा प्रकारही घडला. मेहतांनी संयमित भूमिका घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रभावहीन ठरला.
प्रतिक्रिया – मुस्लिम मराठी महिलाही सहभागी:
मोर्चामध्ये मुस्लिम मराठी महिलांनीही सहभाग नोंदवत, “मराठी माणूस दाबून ठेवायचा प्रयत्न यापुढे सहन केला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली. मीरा-भाईंदर परिसरातील मराठी मुस्लिमांचा आवाजही बुलंद झाला.
राजकीय आणि सामाजिक परिणाम:
- मोर्चामागे सर्वपक्षीय पाठिंबा
- मराठी एकीकरण समितीचे नेतृत्व उठून दिसले
- सरकारवर मराठी माणसांच्या भावना न ओळखल्याचा आरोप
हा मोर्चा होता मराठी अस्मितेसाठीमराठी एकीकरण समितीने दाखवलेली संघटनशक्ती आणि सर्वपक्षीय एकजूट ही महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आशादायक आहे. शासनाने या भावनांचा आदर करत, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे रक्षण करणे गरजेचे आहे.









